Monday 28 March 2016

ईस्टरच्या निमित्ताने



1: Source YouTube
"My name is Anthony Gonsalves" असे गाणं 'अमर अकबर अँथनी' मधला अँथनी म्हणजे अमिताभ बच्चन पडद्यावर म्हणताना पाहिला आहे का? ईस्टर संडेच्या पार्टीमधलं हे गाणं. या पार्टीत अँथनीची एन्ट्री होते तीच एका अंड्या मधून. 
Source: Blog BoxOffice
एका पोकळ अंड्यातून अँथनी येतो.गाण्याच्या दरम्यान अंड्यात उडी मारतो, ईस्टरला अंड्याचे महत्व , तेव्हढेच महत्त्व या गाण्यात ईस्टरच्या अंड्याला सिनेमाचे दिगदर्शक मनमोहन देसाई यांनी आबाधित ठेवले आहे.
ईस्टर संडे हा दरवर्षी एका रविवारी येणारा ख्रिस्ती धर्मींयांचा सण. या रविवारच्या आधीचा शुक्रवार हा गुड फ्रायडे (Good Friday).
ख्रिसमस व ईस्टर संडे हे दोन ख्रिस्ती धर्मींयांचे महत्त्वाचे सण. यामधला दरवर्षी ख्रिसमस २५ डिसेंबरलाच साजरा होतोमात्र ईस्टर वेगवेगळ्या रविवारी साजरा केला जातो.
वर्ष
महिना
दिवस
२०१०
एप्रिल
२०११
एप्रिल
२४
२०१२
एप्रिल
२०१३
मार्च
३१
२०१४
एप्रिल
२०
२०१५
एप्रिल
२०१६
मार्च
२७
२०१७
एप्रिल
१६
२०१८
एप्रिल
२०१९
एप्रिल
२१
२०२०
एप्रिल
१२

बाजूच्या कोष्टकावरून हे पाहता येईल. इथे २०१० ते २०२० मधील ईस्टर संडेच्या तारखा दिल्या आहेत.
ईस्टर संडे हा चंद्रावर अवलंबून असणारा सण आहे. सहाजिकच त्याच्या दरवर्षीच्या तारखा बदलणार. ईस्टर संडेची तारी़ख ठरवताना २१ मार्चला महत्व आहे. ह्या दिवशी समसमान काळाचे दिवस  रात्र असतात. या दिवसाला वसंत संपात (vernal equinox) असे म्हणतात. या दिवसानंतर उत्तर गोलार्धातील देशात वसंत ऋतूचे आगमन होते. 
२१ मार्चच्या किंवा वसंतसंपात नंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेनंतरचा पहिला रविवार हा असतो ईस्टर संडे.
ख्रिस्ती धर्मींयांच्या मान्यतेनुसार येशू ख्रिस्त यांना शुक्रवारी क्रॉसवर चढवण्यात आले तर दोन दिवसांनी येशूंनी परत दर्शन दिलेतो रविवार ईस्टर संडे सहाजिकच आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी, येशूंची शवपेटी रिकामी होती त्याचे प्रतीक म्हणून पोकळ अंडी. या दिवशी अंड्यांची रंगरंगोटी करून सजावट वगैरे केली जाते.

याच ईस्टर संडेच्या आधी या वर्षी शिवजयंती आली आहे. ही शिवजयंती छत्रपती शिवाजी महारांजांच्या जन्मतिथीवरून साजरी केली जातेय. गंम्मत अशी आहे की, येशूंची जयंती तारखेप्रमाणे २५ डिसेंबरला ख्रिसमस म्हणून साजरी होते व पुण्यतिथी नेहमीच पौर्णिमा आणि वार यांच्या आधारे साजरी होते. आपण शिवजयंती तारखेप्रमाणे  तिथीप्रमाणे दोन्ही प्रकारे साजरी करतो. बरोबर कोण, चूक कोण हा प्रश्न नाहीशेवटी लोकांना जे पटते ते चालू राहते आणि पटत नाही ते काळाच्या ओघात मागे पडत जाते असे वाटते.

Sunday 6 September 2015

राष्ट्रीय सौर दिनदर्शिका
आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर रुपया, भाषा, ध्वज, राष्ट्रीय मुद्रा या सारख्या ओळख निवडण्यात आल्या, घटना तयार करण्यात आली. या सगळ्यांत परंपरा व शास्त्रीय दृष्ट्या विचार आहे. तशीच पं. जवाहरलाल नेहरू यांनी कालगणना असावी या हेतूने एक अभ्यास समिती नेमली. या समितीने "राष्ट्रीय सौर कालगणना" सुचवली. ही सर्व शासकीय यंत्रणा, आकाशवाणी व दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे याचा वापर करतात.
सोबतच्या शासकीय सूचनेमध्ये याचा उल्लेख दिसतो.

राष्ट्रीय सौर कालगणना व वापरामधील इंग्रजी तारखा यांच्यातील Conversion चे Tool, Microsoft Excel मध्ये बनवले आहे.
Excel Conversion Tool

Monday 23 February 2009

२६ जाने चे वैशिष्ट्य

"बाबा, असं झालं का? की २६ जाने ला भारत्तने इंग्रजांविरूद्ध लढाई सुरू केली आणि १५ ऑगस्टला जिंकली?"

माझ्या ६ वर्षाच्या मुलीने मला २६ जाने ला हा प्रश्न विचारला. तिला २६ जाने चे वैशिष्ट्य अजून नीट समजलं नव्हतं जेव्हढं १५ ऑगस्टचे कळलं होतं तेव्ह्ढं. मग मी तिला समजावलं, "१५ ऑगस्टनंतर भारताला स्वतःचे नियम तयार करायचे होते. तो पर्यंत इंग्रज नियम करत होते. मग हे नियम २६ जानेवारीला तयार करून झाले. म्हणून २६ जाने. चे महत्त्व"

"मग त्या आधी इंग्रजांचे नियम आपल्याला कसे कळत होते?" तिची पुढ्ची शंका. "कारण ते तर इंग्रजी बोलायचे, मग त्यांचे नियम आपल्याला कसे कळायचे?"

बापरे! आमच्या अख्या शाळेच्या इतिहासाच्या अभ्यासात मला हा प्रश्न नाही पडला, तो या पहिलीतल्या मुलीला पडला. (इंग्रजांनाही पडला होता).

"म्हणून त्यांनी भारतातल्या लोकांना इंग्रजी शिकवण्यासाठी, इंग्रजी शाळा सुरू केल्या. मग आपल्याला त्यांना समजावता येऊ लागलं" मी तिला माझे इतिहासाचे आकलन तिला सांगितलं.

"म्हणजे इंग्रजांनी चांगले काम केले की. " तिने तीचे इतिहासाचे आकलन स्पष्ट केले.

Tuesday 20 May 2008

आईचे लग्न

ऐन बाजारात, भर चौकात, विठ्ठलाच्या मंदिरासमोर, माझ्या मुलीने आईला विचारले, "आई तुझी किती लग्नं झालीयेत?". आईच्या डोळ्यासमोर टीव्ही चमकले, मालिका गरगरल्या. तरी शांतपणे तिने उलट प्रश्न केला, "का?".

"अगं टीव्हीत दाखवतात ना?"

"एकच"

अर्थात तिने शांतपणे तिचे निरसन केले. "अगं, एका लग्नापेक्षा जास्त लग्न अगदी नाईलाज असेल तर करतात. तुला तुझ्या बाबांऐवजी दुसरे बाबा आवडतील का?"

"नाह्ही!"

हे एवढं शांतपणे, ऐन बाजारात, भर चौकात, विठ्ठलाच्या मंदिरासमोर समजावणे अंमळ अवघडच.

Monday 19 May 2008

घड्याळ

माझ्या मुलीला नर्सरीत, "घड्याळात वाजला एक, आईने केला केक.." हे गाणं शिकवलं होतं. गाणं पाठ झाल्यावर काही दिवसांनी तिची जिज्ञासा जागृत झाली. घड्याळात एक-दोन कसे वाजतात हे तिला जाणून घ्यायचं होतं. आईच्या खनपटीला बसून तिने शिकूनही घेतलं. वयाच्या तिसर्‍या-चौथ्या वर्षी तिला घड्याळ कळू लागलं. आम्हा पालकांना त्याचे काय कौतुक!

आणि मग एका रविवारी, दिवसभर मुलीबरोबर दंगा चालला होता. रात्र झाल्यावर, मला सोमवारचे वेध लागले. झोपून जावे तरी, हिची दंगा-मस्ती सुरूच. रात्रीचे ११ वाजले, १२ वाजले, १२.३० वाजले तरी मुलीचा झोपण्याचा विचार काही दिसेना. शेवटी १ वाजता, माझा संयम संपला आणि निर्वाणीच्या भाषेत तिला दटावलं, "रात्रीचा १ वाजलाय. आता गपचूप झोपायचे."

यावर घड्याळ कळणार्‍या माझ्या हुशार मुलीने विचारले, "बाबा, रात्रीपण एक वाजतो?"

Tuesday 26 February 2008

मराठी शाळांच्या सद्यस्थिती

लोकसत्ताच्या २४.०२.२००८ च्या लोकरंग मधील लेख मराठी शाळांच्या सद्यस्थितीबद्दल आलेला शुभदा चौकर यांचा लेख.







Tuesday 12 February 2008

ड - डोनेशनचा

शाळांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहेत काहि शाळांमधून पूर्णपण झाल्या असतील. प्रवेशप्रक्रिया वेळी पालकांना धास्ती असते ती 'डोनेशन' ची. पालकांना आपल्या पाल्यांच्या शाळेची ओळख ही 'डोनेशन' मुळे अडवणूकीच्या भावनेने होते.

शिक्षणसंस्थाना यात मी पूर्णपणे दोषी मानणार नाही. शिक्षणसंस्थाना नवीन कामांसाठी निधीची आवश्यकता असते आणि त्यासाठी त्यांना नवीन प्रवेश घेणारे पाल्य हा एक स्त्रोत असते.

यावर उपाय म्हणून एक पर्याय सुचतो, तो म्हणजे, शाळेला दिलेल्या देणग्यांना आयकरात सवलत देणे. आयकरात व सर्व करांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी ३% एवढा वेगळा कर आकारला जातो. तो सरकारी "सर्व शिक्षा अभियाना" साठी वापरण्यात येतो.

पाल्याची "शैक्षणिक शुल्क व सत्र शुल्क" व "शैक्षणिक कर्जावरील व्याज" ८०सी खाली करमाफ असते. या सवलतीचा उपयोग उच्च शिक्षण घेणार्‍यांसाठी होतो.

जर फक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी शिक्षणसंस्थाना दिलेली देणगी जर करमुक्त केली तर त्याचा फायदा पालकांना व शिक्षणसंस्थाना दोघांना होईल. ह्या साठी एक कलम ८०सी मध्ये न वाढवता, ८०जी सारखे एखादे कलम ६-अ मध्ये वाढवावे. ८०जी सारखी देणगीच्या ५०%, १०% रक्कमेची करमाफी न करता पूर्ण करमाफी द्यावी.

यामुळे देणगीदारांना होणारे फायदे
1. देणगीदारांना आयकरात सवलत
2. शिक्षणसंस्थानी प्रवेशासाठी अडवणूक केल्याची भावना राहणार नाही
3. आपण शिक्षण घेतलेल्या शाळेला देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी.
4. वैवाहिक जीवन सुरू होण्याआधीही शैक्षणिक देणगी द्वारे आयकरात सवलत
शिक्षणसंस्थाना होणारे फायदे
1. देणगी फक्त प्रवेशाच्यावेळी न मिळता, पालकांकडून प्रत्येक वर्षी मिळू शकते. पालकांना प्रवेशावेळची देणगी रक्कम कमी भरावी लागून ही जास्त निधी मिळू शकेल.
2. फक्त पालकांकडून देणगी मिळण्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडून, आयकर सवलत हवी असणार्‍या देणगीदारांकडून ही देणगी मिळू शकते
3. विना अनुदानित संस्थाना निधी मि़ळण्यासाठी एक सुकर मार्ग होईल