Tuesday 20 May 2008

आईचे लग्न

ऐन बाजारात, भर चौकात, विठ्ठलाच्या मंदिरासमोर, माझ्या मुलीने आईला विचारले, "आई तुझी किती लग्नं झालीयेत?". आईच्या डोळ्यासमोर टीव्ही चमकले, मालिका गरगरल्या. तरी शांतपणे तिने उलट प्रश्न केला, "का?".

"अगं टीव्हीत दाखवतात ना?"

"एकच"

अर्थात तिने शांतपणे तिचे निरसन केले. "अगं, एका लग्नापेक्षा जास्त लग्न अगदी नाईलाज असेल तर करतात. तुला तुझ्या बाबांऐवजी दुसरे बाबा आवडतील का?"

"नाह्ही!"

हे एवढं शांतपणे, ऐन बाजारात, भर चौकात, विठ्ठलाच्या मंदिरासमोर समजावणे अंमळ अवघडच.

Monday 19 May 2008

घड्याळ

माझ्या मुलीला नर्सरीत, "घड्याळात वाजला एक, आईने केला केक.." हे गाणं शिकवलं होतं. गाणं पाठ झाल्यावर काही दिवसांनी तिची जिज्ञासा जागृत झाली. घड्याळात एक-दोन कसे वाजतात हे तिला जाणून घ्यायचं होतं. आईच्या खनपटीला बसून तिने शिकूनही घेतलं. वयाच्या तिसर्‍या-चौथ्या वर्षी तिला घड्याळ कळू लागलं. आम्हा पालकांना त्याचे काय कौतुक!

आणि मग एका रविवारी, दिवसभर मुलीबरोबर दंगा चालला होता. रात्र झाल्यावर, मला सोमवारचे वेध लागले. झोपून जावे तरी, हिची दंगा-मस्ती सुरूच. रात्रीचे ११ वाजले, १२ वाजले, १२.३० वाजले तरी मुलीचा झोपण्याचा विचार काही दिसेना. शेवटी १ वाजता, माझा संयम संपला आणि निर्वाणीच्या भाषेत तिला दटावलं, "रात्रीचा १ वाजलाय. आता गपचूप झोपायचे."

यावर घड्याळ कळणार्‍या माझ्या हुशार मुलीने विचारले, "बाबा, रात्रीपण एक वाजतो?"