Thursday 17 January 2008

तुम्ही ऑफीसमध्ये गेल्यावर हातपाय धुता?

बाबा तुम्ही ऑफीसमध्ये गेल्यावर हातपाय धुता?

माझ्या ६ वर्षाच्या मुलीने बालसुलभ कुतुहलाने प्रश्न विचारला. तिच्या प्रश्नामध्ये जाब विचारण्याचा अविर्भाव अजिबात नव्हता. पण तिच्या या प्रश्नाने मी पूर्णपणे गोंधळून गेलो. कधीही बाहेरून आलं की आधी हातपाय धुवायचे, हे प्रत्येक वेळी तिला ऐकवत असतो. प्रसंगी ओरडत असतो.

बाहेरून आल्यावर हातपाय धुवायचे या मागचे तत्त्वं माझ्या मुलीला कळलं. ते पालकांनी कुठे कुठे अंमलात आणायचे हे ही तिला कळलं. आणि मी ते तत्त्व पूर्णपणे विसरलो. कार्यालयात पोहचताना बस, रेल्वे, रिक्षा किंवा स्वतःचे वाहन यानी प्रवास करून जातोय. आपले हात तरी कार्यालयात गेल्यावर धुतो का?(चेहरा बरा दिसावा म्हणून तोंड धुत असतील.)

आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी पालक आटापिटा करतात, पण त्यामागची तत्त्वं राहतात बाजूला आणि एखाद्या कर्मकांडाप्रमाणे सवयी मुलांकडून पाळल्या जातात का अशी पोलिसगिरी उरते का? मुले तर मोठ्यांचेच आचरण तपासून स्वतः वागत असतात, तर पालकांनो सवयी लावण्याची तत्त्वे तपासा.

Monday 14 January 2008

उत्तुंग

सर एडमंड हिलरींविषयी फारच कमी माहिती होती. कालच वर्तमानपत्रात वाचली. बापरे, एवरेस्ट, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव तीनही ठिकाणी हा माणूस जाऊन आला होता. गंगेचे मुख ते गंगेचा उगम असा उलटा प्रवास केला होता. गंगेच्या उगमाजवळच्या १९००० फूटी शिखरावर चढून त्यांचा प्रवास संपवला. म्हणजे गंगा जमीनीवर अवतरते तिथपर्यंत सर जाऊन आले होते.

भारतात न्यूझीलंड्चे राजदूत म्हणून राजीव गांधींच्या काळात पदभार सांकार्य, 'हिमालय ट्रस्ट' चे कार्य हे सर्व वाचल्यावर हे व्यक्तिमत्व उत्तुंग नव्हे सर्व दिशा व्यापणारे होते असे जाणवते.

सर एडमंड हिलरींना आदरांजली !

Thursday 10 January 2008

मोबाईल

सांता बांता एकमेकांचे शेजारी असतात. सांता बांताला मोबाईलवरून फोन करतो. फोन लागत नाही,

पुन्हा फोन करतो. फोन लागत नाही,

पुन्हा फोन करतो. फोन लागत नाही,

शेवटी सांता बांताला पत्र लिहायला घेतो.

तीनचार दिवसांनी बांताला पत्र मिळते.

"अरे यार मैं बडी देरसे तुझे फोन कर रहा था। फोन लग्गी ही नही रहा था।

बार बार ऑपरेटर बोल रही थी 'नंबर ईज बिझी| ट्राय अगेन लेटर।' तो लेटर लिख रह्हा हूं।"

Wednesday 9 January 2008

काही सत्ये

Friend in need is friend indeed: ज्याला आपली गरज आहे तोच खरा मित्र
सार्वजनिक गोष्टी सार्वनजीक नसतात

Monday 7 January 2008

मीठनीती

स्वातंत्रपूर्व काळात मीठावर ब्रिटीशांनी कर लादल्यामुळे, भारतातील जनतेला साधे मीठ खाणे हे अशक्यप्राय झाले. मीठाच्या कमतरतेमुळे भारतातील गरीब जनता ही कुपोषित राहिली, होणार्‍या अन्यायाविरूध्द आवाज उठवण्याची उमेद त्यांच्यात राहीली नाही. दुष्काळाच्या फेर्‍यात किंवा एखाद्या साथीच्या रोगात ही अशक्त जनता मान टाकू लागली. मीठावरचा कर वसूल व्हावा यासाठी ब्रिटीशांनी व्यवस्थित योजना राबवली. या सर्वांविरूध्द आवाज उठवला तो गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह करून. हे "ब्रिटीशांची कुंपणनीती" या लेखाच्या व त्या संदर्भातील वाचनानंतर लक्षात आले. तेव्हा पासून मीठाच्या बाबतीत स्वातत्र्यानंतर भारतीय सरकारची निती काय आहे, असा प्रश्न सारखा येत होता.

गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह केला तर सरकार आयोडिनयुक्त मीठाचा अत्याग्रह करत आहे.

भारतातील अनेक भागात कुपोषण, रोगराई असण्याला आयोडीनची कमतरता हे एक कारण आहे. यावर उपाय म्हणून खाण्यासाठी आयोडीयोयुक्त मीठ वापरण्याची सक्ती भारत सरकारने केली आहे. त्या संदर्भात काही नोंद करण्यासारखे.मुद्दे:

आयोडिनची कमतरता दूर करण्यासाठी भारत सरकारने एक कार्यक्रम आखला आहे (National Iodine Deficiency Disorders Control Programme (NIDDCP)). हा कार्यक्रम प्रत्येक राज्यसरकारे आपआपल्या राज्यात अंमलात्त आणतात.
आयोडीनयुक्त मीठाचे उत्पादन वाढवणे.
उत्पादनाच्या क्षेत्रापासून इतर ठिकाणी रेल्वेने वाहतूक करण्यासाठी रेल्वेमंत्रालयाने मीठाला "बी" दर्जाचे म्हणजे संरक्षण खात्याच्या खालोखाल प्राधान्य दिले आहे.
हैद्राबादस्थित National Institute of Nutrition (NIN) ने Double Fortified Common Salt (DFS: आयोडीन व लॉहयुक्त मीठ) उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे, हे तंत्रज्ञान भारतातील अनेक प्रमुख मीठ उत्पादक खाजगी कंपन्याना व मीठ उत्पादकांना मोफत पुरवण्यास तयार आहे. हे तंत्र हस्तांरीत केल्यानंतर खाजगी कंपन्यांना मीठ उत्पादनातील २०% भाग सरकारी "स्वस्त धान्य पुरवठा" यंत्रणेला द्यावा अशी अट हस्तांतरणावेळी होणार्‍या करारात असणार आहे. (दै. हिंदू: २० जून २००७)
अजूनही आयोडीन कमतरतेवर मात करण्याची योजना "सर्वेक्षण", "लोकजागृती" या स्तरावर आहे. आयोडीनची कमतरता असलेल्या क्षेत्रामध्ये आयोडीनयुक्त मीठाचा पुरवठा केल्यानंतर दर ५ वर्षांनी सर्वेक्षण करून आयोडीनयुक्त मीठाचा परिणाम निश्चित करणे अशा स्वरूपाचा कार्यक्रमातील एक भाग आहे. (मीठाचा पुरवठा वाढवण्यासाठी निश्चित कार्यक्रम नाही)
भारत सरकारने माणसांच्या खाण्यासाठी साध्या मीठाच्या विक्रीवर अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली १७ मे २००६ पासून पूर्णपणे बंदी घातली आहे.
आंध्र, अरूणाचल प्रदेश, आसाम, छ्त्तीसगड, हरीयाणा, हिमाचल, कर्नाट़क, गुजरात, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, ओरीसा या काही राज्यांनी आयोडीनयुक्त मीठ स्बस्त धान्य योजनेमधून काही प्रमाणात वितरीत करतात. पण भारत सरकारची योजना नाही.

मीठाची जीवनानश्यक वस्तू म्हणून अजून रेशनमधून पुरवठा होत नाही किंवा त्याला सबसिडी नाही. (महाराष्ट्र सरकारच्या आरोग्यविभागाने ही मागणी केली आहे आणि आयोडीनची कमतरता असलेल्या भागामध्ये तरी रेशन द्वारे आयोडीनयुक्त मीठ पुरवावे. नियोजन आयोगाने धोरण ठरवावे अशीही मागणी आहे.)

आयोडीनयुक्त मीठाची एवढी सक्ती आहे. पण बाजारात खाजगी कंपन्यांच्या आयोडीनयुक्त मीठाची किंमत सुमारे रू.१०/प्रति किलो आहे. तेथेच साध्या मीठाची आता बंदी असल्यामुळे किंमत विचारात घेता येत नाही(किंमत रू.४/प्रति किलो ६ महिन्यांपूर्वी. ). परिणामी मीठाच्या किंमतीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

स्वातंत्र्पूर्व काळातील मीठाची भाववाढ व आताची भाववाढ यात फरक काय राहिला ?

Saturday 5 January 2008

उपक्रम वरील चर्चेतला प्रतिसाद http://mr.upakram.org/node/905

कोडे सुटले ?
प्रेषक अवन (सोम, 12/10/2007 - 19:49)
१) कोणी 'दि ग्रेट हेज ऑफ इंडिया' पुस्तक वाचले आहे का? (आमच्या ग्रंथालयामधे तरी हे उपलब्ध नाही). असल्यास त्यात या भिंतीबद्दल असे कोणते पुरावे आहेत?
२) जर अशी १५००मैल लांबीची भिंत बांधली गेली तर् त्याचे उल्लेख समकालीन भारतीय लेखनात मिळतात का? या भिंतीचे नाव होते का?
३) जर अशी भिंत अस्तित्वात होती तर ती आपोआप काळाच्या पडद्याआड गेली की तोडण्यात आली? यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? इतकी मोठी (लांब) भिंत हा ऐतिहासिक ठेव्याबरोबरच स्थापत्याच्या बाबतीतही अनमोल होता. बरिक सारिक गोष्टी जसेच्या तसे सांभाळणार्‍या इंग्रजांनी भिंत तोडली असेल असे वाटत नाही.

यातील तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर मिळाले असे मला वाटते.

धन्यवाद गुगल!

मॉक्समच्या पुस्तकावरून गुगलत एका महत्त्वाच्या दुव्यापर्यंत आलो. त्यावरून माझी निरीक्षणे पुढे देत आहे.

ब्रिटिशांनी भिंत उभारली नाही तर एक कुंपण तयार केले असावे. ब्रिटिश म्हणजे 'इस्ट ईंडिया कं'.

१६०० काळात पॉटेशियम नायट्रेटला (मीठ) इंधन वा दारूगोळा म्हणून युरोपात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. आणि भारतातील बिहार, पंजाब इ. भागात "नुनीया" (Nuniah) जातीची कुटुंबं एप्रिल ते जूनच्या उन्हाळी मौसमात नापीक जमीनीतून हे मीठ मिळवण्याचा उद्योग करत असतं. कं. ह्या मीठाचा व्यापार करत असे. हे मीठ निर्यात करायची इंग्लडला.

कं. नीला त्यांच्याकडून मिळवलेल्या मीठाची वाहतूक करताना स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत असे. जसा की खंडणी मागणे, लूटालूट, वाह्तूक करणार्‍याची आपआपसातील भांडणं इ.
ह्या आगलाव्या मीठाला मौल्यवान अशा कापूस, रेशीम, मसाल्याचे पदार्थ वस्तूंबरोबर ठेवणे हे जहाजवाल्यांनाही मान्य नव्हते.

तरी अशा दारूगोळा बनवण्याच्या कामात ह्या मीठाला मोठी मागणी होती. इंग्लडात दारूगोळा बनवण्याचे काम एकाच व्यावसायिक कुटुंबाची मक्तेदारी होती. शिवाय कं. नीचीही दारूगोळा बनवण्याचा उद्योग होता आणि कं. नीला ठराविक हिस्सा राजाला विकावा लागत. राजाला विकायचा म्हणजे, राजा म्हणेल त्या किंमतीत राजाला द्यायचा. (पण फुकट नाही). त्यातून माल चांगला असला पाहिजे.

या उद्योगामध्ये कं. फारच अडचणीत सापडली, इतकी की, त्यांच्या इंग्लडमधून होणार्‍या चांदीच्या निर्याती वर त्यांना कर भरावा लागून, राजाधिराजांकडून सर्व कृपादृष्टीला पारखं व्हावं लागलं असतं.

यातून सर जॉन बँक्स ने राजा व कं. मध्ये मध्यस्थी घडवून आणली. या मध्यस्थी नुसार कं. राजाला ठराविक मीठ लिलावाद्वारे विकणार. या लिलावाची मुदत एका मेणबत्तीवर अवलंबून असे. एक इंच लांबीची मेणबत्ती जळेपर्यंत लिलाव चालू राहणार. या मध्यस्थीमुळे कं. मीठ निर्यात करू शकणार होती. हे कं. नीला व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक होतं. लागोपाठ दोन वर्ष १६७२-१६७३ बँक्सने मध्यस्थी करवून कं. नीला अडचणीतून बाहेर काढले. याच काळात युरोपात युद्धे चालू असल्यामुळे मीठाला मागणीही मोठी होती.
असा हा व्यवसाय कं. नीचा चालू होता. (या काळात हे कुंपण घातले गेले असणार)

१८८० साली स्विस व फ्रेंच शास्त्रज्ञांनी कापूस दारूत मिसळून दारूगोळा तयार केला त्याआधी जर्मनीतील खाणींमध्ये या मीठाचा साठा सापडला. पुढे हेबर- बॉश यांनी पॉटेशियम नायट्रेट निर्माण करण्याची प्रक्रीया शोधून काढल्यावर नैसर्गिक मीठाची गरज संपुष्टात आली. भारतीय मीठाच्या व्यापाराचे कं. साठी महत्व १८८० नंतर उरले नाही.

हा सर्व इतिहास पाहता, ते कुंपण ई.ई.कं. नी ने स्वतःच्या व्यवसायासाठी घातलेले होते. त्याची व्यावसायिक गरज संपल्यावर कं. नी ने पूर्णपणे दुर्लक्षित करणे हे त्यांच्या व्यावसायिकतेशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे कुंपणाचे अस्तित्व आता दिसत नाही.

आणखी एक, हे कुंपण भारताच्या मध्यभागात अफगाणिस्तानापासून ओरिसापर्यंत होते. (मीठ म्हट्लं की एकदम किनारपट्टीचा प्रदेश डोळ्यासमोर येतो तर तसे नाहिये.)

टिपः मी कुठलाही इतिहास तज्ञ नाही. त्यातून इंग्रजीच्या लेखाचा अनुवाद करण्याचा अनुभव नसून प्रयत्न आहे. गुगल मातेच्या शक्तीमुळे हा इतिहास माझ्यासमोर उभा राहिला तसा सर्वांसमोर मांडावा या दृष्टीने हा लेख. चू.भू.दे.घे.

श्रेय आव्हेरः मुळातून संदर्भ समजून घेण्यासाठी संदर्भ १ वाचावा.

संदर्भः

http://www.salt.org.il/frame_india.html
http://www.salt.org.il/saltpet.html
http://www.tax-news.com/archive/story/The_Best_Tax_Is_A_Dead_Tax_xxxx145...
http://www.rmoxham.freeserve.co.uk/salt%20starvation.htm Inland Customs Department. 1869. Report on the administration of the Inland Customs Department, 1868-69. Allahabad: Government Press.

Thursday 3 January 2008

पीजे

पहिला: P (पी)

दुसरा: Q (क्यूं ?)

पहिला: RR आर. आर. खाताना बघतात

दुसरा: S (एस)

२००८ दिनदर्शिका