Thursday 17 January 2008

तुम्ही ऑफीसमध्ये गेल्यावर हातपाय धुता?

बाबा तुम्ही ऑफीसमध्ये गेल्यावर हातपाय धुता?

माझ्या ६ वर्षाच्या मुलीने बालसुलभ कुतुहलाने प्रश्न विचारला. तिच्या प्रश्नामध्ये जाब विचारण्याचा अविर्भाव अजिबात नव्हता. पण तिच्या या प्रश्नाने मी पूर्णपणे गोंधळून गेलो. कधीही बाहेरून आलं की आधी हातपाय धुवायचे, हे प्रत्येक वेळी तिला ऐकवत असतो. प्रसंगी ओरडत असतो.

बाहेरून आल्यावर हातपाय धुवायचे या मागचे तत्त्वं माझ्या मुलीला कळलं. ते पालकांनी कुठे कुठे अंमलात आणायचे हे ही तिला कळलं. आणि मी ते तत्त्व पूर्णपणे विसरलो. कार्यालयात पोहचताना बस, रेल्वे, रिक्षा किंवा स्वतःचे वाहन यानी प्रवास करून जातोय. आपले हात तरी कार्यालयात गेल्यावर धुतो का?(चेहरा बरा दिसावा म्हणून तोंड धुत असतील.)

आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी पालक आटापिटा करतात, पण त्यामागची तत्त्वं राहतात बाजूला आणि एखाद्या कर्मकांडाप्रमाणे सवयी मुलांकडून पाळल्या जातात का अशी पोलिसगिरी उरते का? मुले तर मोठ्यांचेच आचरण तपासून स्वतः वागत असतात, तर पालकांनो सवयी लावण्याची तत्त्वे तपासा.