Monday 23 February 2009

२६ जाने चे वैशिष्ट्य

"बाबा, असं झालं का? की २६ जाने ला भारत्तने इंग्रजांविरूद्ध लढाई सुरू केली आणि १५ ऑगस्टला जिंकली?"

माझ्या ६ वर्षाच्या मुलीने मला २६ जाने ला हा प्रश्न विचारला. तिला २६ जाने चे वैशिष्ट्य अजून नीट समजलं नव्हतं जेव्हढं १५ ऑगस्टचे कळलं होतं तेव्ह्ढं. मग मी तिला समजावलं, "१५ ऑगस्टनंतर भारताला स्वतःचे नियम तयार करायचे होते. तो पर्यंत इंग्रज नियम करत होते. मग हे नियम २६ जानेवारीला तयार करून झाले. म्हणून २६ जाने. चे महत्त्व"

"मग त्या आधी इंग्रजांचे नियम आपल्याला कसे कळत होते?" तिची पुढ्ची शंका. "कारण ते तर इंग्रजी बोलायचे, मग त्यांचे नियम आपल्याला कसे कळायचे?"

बापरे! आमच्या अख्या शाळेच्या इतिहासाच्या अभ्यासात मला हा प्रश्न नाही पडला, तो या पहिलीतल्या मुलीला पडला. (इंग्रजांनाही पडला होता).

"म्हणून त्यांनी भारतातल्या लोकांना इंग्रजी शिकवण्यासाठी, इंग्रजी शाळा सुरू केल्या. मग आपल्याला त्यांना समजावता येऊ लागलं" मी तिला माझे इतिहासाचे आकलन तिला सांगितलं.

"म्हणजे इंग्रजांनी चांगले काम केले की. " तिने तीचे इतिहासाचे आकलन स्पष्ट केले.